‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलरमधील अनेक संवादांवर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
राजकीय फायद्यासाठी या
चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी केला. ‘लोकसभा निवडणूक जवळ
आहे. त्यामुळे दुसऱ्याला बदनाम करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा हा प्रकार आहे.
ज्या मनमोहन सिंग यांना ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हटलं जातंय, त्यांनी
अतिशय अवघड स्थितीतून देशाला बाहेर काढलं. त्यांच्या काळात देशाची सर्वांगीण
प्रगती झाली. मात्र आताच्या पंतप्रधानांनी देशाचाच ऍक्सिडंट केला,’ अशा शब्दांमध्ये सावंत यांनी थेट मोदींवर निशाणा साधला.
अनेक दिवसापासून अनुपम
खेर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चर्चेत
आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. भारताचे माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित हा चित्रपट असून अनुपम खेर त्यांची
भूमिका निभावत आहेत.
हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय
बारू यांचे पुस्तक ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ यावर
आधारित आहे.त्या पुस्तकात त्यांनी २००४ ते २०१४ दरम्यानच्या राजकीय घडामोडींवर
भाष्य केले आहे.चित्रपटात अक्षय खन्ना यांनी संजय बारू यांची तर सुजैन बर्नट यांनी
सोनिया गांधी, आहना कुमरा यांनी प्रियंका गांधी आणि अर्जुन माथुर
यांनी राहुल गांधीची भूमिका निभावली आहे.